पुणेरी टाइम्स टीम…
दौंड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय (प्रांत) कार्यालय व्हावे यासाठी सुरुवातीपासून आमदार राहुल कुल हे प्रयत्न करत होते. आता ही मागणी मान्य झाली असून या कामाला प्रत्यक्षात यश आले आहे. दौंडसाठी स्वतंत्र उपविभागीय कार्यालय दौंड प्रशासकीय इमारतीत सुरू होणार असून या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन (दि. 10) रोजी दुपारी ४ वाजता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आमदार राहुल कुल यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
दौंड उपविभागीय (प्रांत) कार्यालय हे विशेष बाब म्हणून या महायुतीच्या सरकारने मंजुर करून दिले आहे. या उपविभागीय (प्रांत) कार्यालयामुळे तालुक्यातील नागरिकांना इतरत्र जाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. दौंड तालुक्यातील जनतेला निवडणुकीच्या वेळी हे कार्यालय दौंड मध्ये आणणारच असा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केल्याने मला समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच दौंड शहरातील अनेक दिवसांपासून क्रीडा संकुलची मागणी होती तो प्रश्नही मार्गी लागला असून क्रीडा संकुलचेही हस्तांतरण यावेळी होणार आहे. तसेच दौंड-गोपाळवाडी रोडच्या कामाचे भूमिपूजनही होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपविभागीय (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन, क्रीडा संकुलाचे हस्तांतरण व दौंड – गोपाळवाडी रस्त्याचे भूमिपूजन समारंभ झाल्यानंतर दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार अॅड. कुल यांनी सांगितले.