दौंड – पुणेरी टाइम्स
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणारे आणि नंतर आपल्या गुंडाकरवी हल्ला करणारे आमदार किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करणेबाबत आज दौंड तालुका पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जाधव, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे…
जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर बुधवारी भ्याड हल्ला करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या एका बातमीवरून संतापलेल्या किशोर पाटील यांनी अत्यंत अर्वाच्च, शिवराळ भाषेत महाजन यांना शिविगाळ केली. त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर उभा महाराष्ट्र नि:स्तब्ध झाला. एक लोकप्रतिनिधी, आमदार एवढी शिवराळ भाषा कशी वापरू शकतो असा प्रश्न महाराष्ट्राला पडला. किशोर पाटील यांनी केवळ शिव्याच दिल्यानाहीत तर महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. हे सारं संतापजनक आणि निषेधार्ह आहे.
त्यामुळे विषय येथेच संपत नाही, गुरूवारी सकाळी काही गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला. तो व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्या गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला ते देखील नेहमी किशोर पाटील यांच्याबरोबर असतात असा संदीप महाजन यांचा आरोप आहे. आरोपींचे आणि किशोर पाटील यांचे मोबाईल संभाषण तपासले तर हा किशोर पाटील यांचाच कट असल्याचे दिसून येईल असाही संदीप महाजन यांचा आरोप आहे.
आमची आपणास विनंती आहे की, महाजन यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून या मागचे जे सूत्रधार आहेत. त्या किशोर पाटील यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. पत्रकारावर हल्ला करून, होय मीच शिविगाळ केली अशी अरेरावीची भाषा नॅशनल टीव्हीवर वापरून पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करणार्या आमदार किशोर पाटील यांच्यावर कठोर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सर्व प्रमुख संघटना एकत्र येऊन राज्यात उग्र आंदोलन करतील. कारण दु:ख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकवता कामा नये अशी आमची मागणी आहे.
महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे काम करणे अवघड होत आहे. माध्यमांची ही मुस्कटदाबी चिंताजनक असून आम्ही हे कदापिही सहन करणार नाही. आमची आपणास विनंती आहे की, राज्यात पत्रकार संरक्षण कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं कायद्याचा धाक कोणाला उरला नाही. त्यामुळे पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेस द्यावेत अशी आग्रही मागणी संघाचे वतीने करण्यात आली आहे.
याबाबत प्रशासनाने या विषयात जातीनं लक्ष घालून चौथ्या स्तंभाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं योग्य ती पाऊल उचलाल अशी अपेक्षा यावेळी दोन तालुका पत्रकार संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.