पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)
राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे जोरदार पडघम वाजू लागले आहेत. यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने तब्बल 45 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अनेक निष्ठावंतांना संधी दिल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बालेकिल्लातील व स्वतःच्या मुलीचा मतदार संघ असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती, इंदापूर येथेही आपले उमेदवार पवारांनी जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या लेकीला निवडणुकीत विजयाच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करीत खासदार सुप्रिया सुळे यांना दिल्लीत पाठवण्यासाठी शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांसह विरोधकांच्याही घरी जावून गाठीभेटी घेत येथील प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली होती. याचवेळी खुद्द शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात आणि पक्षाच्या पडीच्या काळात दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी मात्र अजित पवार यांना साथ देत महायुतीचा जोरदार प्रचार केला होता. यावेळी रमेश थोरात यांनी मुलाखतीवेळी सुप्रिया सुळे यांनी दौंडसाठी काय केले. तसेच बारामतीच्या खासदारांनी दौंड तालुक्यात एक रुपयाचा निधी दिला नाही, असे वक्तव्य केले होते, याबाबतच्या बातम्यांची कात्रणे सध्या सोशल मीडियावरती फिरत आहेत. याच काळात आपल्या अनेक कार्यकर्त्यांना रमेश थोरात बजावून सांगत होते की, सुनेत्रा पवार यांचा प्रचार करा. अजित पवारांसाठी आपल्याला यावेळी काम करायचे आहे.
या लोकसभा निवडणुकी दरम्यान संपूर्ण तालुका व गाव भेट दौरा करीत येथील प्रचाराची जोरदार यंत्रणा थोरात यांनी राबवली होती. मात्र येथील जनतेनी शरद पवार यांना सहकार्य करीत आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून सुप्रिया सुळे यांना मोठं मताधिक्य दिले आहे. आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात यांनाही इथल्या मतदारांनी अंदाज दिला नाही.
मात्र विधानसभेचे वातावरण सध्या तापू लागले असतानाच रमेश थोरात यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेणे येथील उमेदवारासाठी इच्छुक असणे कार्यकर्त्यांचा तुतारीकडे जाण्याचा आग्रह याबाबत अनेक माध्यमांना माहिती दिली आहे मात्र काहीच महिन्यापूर्वी थेट शरद पवारांशी फारकत घेऊन रमेश थोरात यांनी विरोधात काम केले होते. आता मात्र हेच थोरात पवारांकडे उमेदवारीसाठी जात असल्याने दौंडची उमेदवारी निष्ठावंतला डावलून थोरातांना देणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दौंड च्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही, शरद पवारांच्या राजकारणात कधी, केव्हा, कुठे, काहीही होऊ शकते. त्यामुळे शरद पवारांची भूमिका दौंडच्या उमेदवारीमध्ये महत्त्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीत वैयक्तिक शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रमेश थोरात यांनी काम केल्यामुळे अद्याप तरी थोरात यांना दुर ठेवले जात असल्याचे अनेक जाणकार बोलून दाखवत आहेत. दौंडच्या या विधानसभेच्या उमेदवारीवर पुढील लोकसभेची बारामतीची सीट धोक्यातून बाहेर काढून खासदार सुप्रिया सुळे साठी सेफ मतदारसंघ करण्याची राजकीय खेळी पवार खेळू शकतात… जर उमेदवारी निष्ठावंतांना डावलून दिली तर निष्ठावंत काय भूमिका घेणार की इंदापूरची पुनरावृत्ती दौंड मध्ये घडवून आणणार पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…