पुणेरी टाइम्स टीम.,
संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागल्याने सर्वत्र नेते मंडळी यांनी घोंगडी बैठका आणि आपले गावदौरे सुरू केले आहेत. दौंड मध्ये ही कुल थोरात यांनी आपले गाव भेट दौरे घोंगडी बैठका, पदाधिकाऱ्यांशी संपर्क करीत आपल्या मतांची जुळवाजुळ करायला सुरुवात केली आहे. दौंड येथे स्थानिक राजकारणात तुल्यबळ असलेले कुल आणि थोरात असे दोन गट आहेत, मात्र कायम राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून असलेले कुल – थोरात हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मात्र एकत्र येत एकमेकांना मिठाई भरवत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी महायुतीच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना मतदारांनी पाहिले आहे. मात्र दोन कट्टर राजकीय विरोधक यांचे एकत्र येणे येतील मतदारांना आवडले नाही. अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून शरद पवारांना दगाफटका करीत भारतीय जनता पार्टी सोबत महायुती मध्ये जाणे शेतकरी मतदारांना सहन झाले नाही. नेहमी पवार विरोधी असणाऱ्या दौंड तालुक्यातील मतदारांनी या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना जवळपास 25 हजार इतक्या फरकाने मोठे मताधिक्य दिले. संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या तुतारीचा बोलबाला झाला. आणि शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हाने ही निवडणुक भलतीच गाजवली. यापूर्वी दौंड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व पवार कुटुंबाला अनेक वेळा धोबीपछाड मिळाली आहे. शरद पवार यांना आपल्याच राजकीय बालेकिल्ल्यात गेल्या 30 वर्षात अपवादात्मक निवडणुका वगळल्या तर पवारांच्या राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हाला दौंडमध्ये फारसे यश आले नाही. येथील मतदारांचा मूड हा नेहमीच वेगळा राहिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी आणि घड्याळाच्या राजकारणाला यापूर्वीही दौंड मधील मतदारांनी नेहमी नाकारले आहे. आजचे राजकीय चित्र पाहिले असता राष्ट्रवादीमध्ये झालेली उभी फूट आणि राष्ट्रवादीतील दोन गटात विभागलेले स्थानिक नेते याचा फायदा महायुतीला झाल्याशिवाय राहणार नाही. भारतीय जनता पार्टीचे दौंड चे विद्यमान ‘आमदार राहुल कुल’ यांना याचा मोठा राजकीय फायदा होणार आहे, असा राजकीय दिग्गजांचा अंदाज आहे. महायुतीकडून दौंडची जागा ही भारतीय जनता पार्टीला फिक्स असल्याचे बोलले जाते, त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेले अजित पवार गटाचे नेते माजी आमदार रमेश थोरात यांनी आपल्या कार्यकर्त्यांना तयारीला लागा, कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढायची आहे असे जाहीर करीत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या या राजकीय विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, तर कुल यांची डोकेदुखी वाढणार आहे. कार्यकर्त्यांनी हाती तुतारी घेण्याचा आग्रह धरल्याने शरद पवार यांच्या भूमीकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. शरद पवार यांनी रमेश थोरात यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी दिली तर निष्ठावंतांनी काय फक्त ‘सतरंज्या उचलायच्या’ का असा सवाल शरद पवार गटाचे स्थानिक निष्ठावंत नेत्यांचे अनेक कार्यकर्ते कुजबुज करीत बोलून दाखवत आहेत.. त्यामुळे शरद पवारांनी जरी येथील राजकीय सूत्र फिरविले, आपली भूमिका बदलली तरी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते वेगळी भूमिका घेणार का? पवारांच्या भूमिकेला शह देणार का? हे मात्र गुलदस्त्यात आहे. शरद पवार हे दौड मधून निष्ठावंतांना संधी देणार की आयात उमेदवारांला स्वीकारणार याची मात्र मोठी चर्चा दौंड मध्ये होत आहे…
दौंडच्या राजकारणाचा राजकीय संदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच या संदेशाखाली काही लोक ‘फक्त अंगठा’ या चिन्हाचा वापर करून आपले मत व्यक्त करतात हा अंगठा नक्की तारणार की पाडणार हे नेटकरी सध्यातरी सांगायला तयार नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत येथील मतदार कोणाला ‘अंगठा’ दाखवणार हे येणारा काळ दाखवून देईल.