पुणेरी टाइम्स टीम…
मोदींच्या विकासाच्या विरोधात कुठलाही मुद्दा नसल्याने विरोधक संविधान बदलाच्या पुड्या व अफवा सोडायचे काम करत आहेत. हे नवीनच काढले लोकसभेची ही शेवटची निवडणूक आहे हा त्यांना झालेला भास आहे. मुस्लिमांना निवडणुकीनंतर परदेशात पाठवणार हा सोशल मीडियातला प्रचार बकवास आहे. हलक्या कानाचे राहू नका. ४०० पार असा नारा दिला तर चुकीचं काय. खमका नेता, प्रशासनावर पकड, निर्णय घेण्याची क्षमता, पूर्ण बहुमत व स्थिर सरकार असेल तर विकास होतो. दूरदृष्टी असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथे केले. दौंड येथे सिटी अॅव्हेन्यूच्या सभागृहात अजित पवार यांनी वकील व वैद्यकीय संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. वकील व वैद्यकीय व्यावसायिकांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला व पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले दहा वर्षात मोदींनी संविधानाचा आदरच केलेला आहे. संविधान बदलणार ही अफवा आहे. मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी संविधानाचा आदरच केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापर्यंत अनेक वेळा घटनादुरुस्ती झाली आहे. मी कामाचा हापापलेला माणूस आहे. सत्तेचा नाही. मात्र विरोधी पक्षात बसून विकास होत नाही.२०१४ ची माझी भूमिका कशी बदलली. २०१४ ला मोदींवर टीका करत होतो. २०१९ मध्ये शिवसेनेसारख्या जातीयवादी म्हटल्या जाणाऱ्या पक्षासोबत अडीच वर्षे सत्तेत काढली. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा घेऊन काम करतोय. ही भावकी गावकीची निवडणूक नाही. देशाची निवडणूक आहे. मोदींना पर्याय नाही. वर्षात एकही सुट्टी न घेता काम करणारा नेता म्हणजे मोदी आहेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात काम करून अनुभव घ्यायला पाहिजे होता. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलनाच होऊ शकत नाही असेही पवार म्हणाले. सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले मागच्या कारकिर्दीतल्या खासदारापेक्षा आमच्या खासदाराची कारकीर्द नक्कीच चांगली राहील महायुतीला मताधिक्य दिले तर बारामती मतदार संघाचा चेहरा मोरा नक्की बदलणार. महायुतीचा खासदार करा दौंडला विद्यानगरी उभी करतो. यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, वासुदेव काळे, प्रेमसुख कटारिया, वैशाली नागवडे विरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.