पुणेरी टाइम्स टीम…
महाराष्ट्र राज्यातील गाव कामगार पोलीस पाटलांचा वेतन वाढीचा प्रश्न अनेक दिवसांपासून रखडलेला होता. गाव कामगार पोलीस पाटील हा प्रशासन व गावांमधील महत्त्वाचा दुवा असून गाव कामगार पोलीस पाटील यांना पूर्वी मोठी वतनदारी असायची, मात्र सध्या पोलीस पाटलांना शासनाकडून दरमहा सहा हजार पाचशे रुपये एवढेच मानधन देण्यात येत होते. वाढती महागाई, पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयातील मीटिंग, प्रवास खर्च या अनुषंगाने हे तूटपुंजे मानधन फारच कमी असल्याने गाव कामगार पोलीस पाटील संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, राज्य खजिनदार निळकंठ थोरात पुणे जिल्हा अध्यक्ष साहेबराव राळे, कार्याध्यक्ष सुरेश सोनवणे, विजयराव कुंजीर, सुहास दिवेकर, हनुमंत हंडाळ, आदी पदाधिकारी यांनी आमदार राहुल कुल यांची भेट घेवून ही वेतनाची बाब निदर्शनास आणून दिली होती.
यावेळी आमदार कुल यांनी पोलीस पाटलांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्याच अनुषंगाने आमदार कुल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा पाठपुरावा केला होता. सभागृहातही हा मुद्दा उपस्थित केला होता. व पोलीस पाटलांच्या प्रश्नाबाबत शासनाचे लक्ष वेधून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कुल यांच्या वास्तव मागण्याचा विचार करून पोलीस पाटलांच्या मानधनात भरघोस वाढ करून पंधरा हजार रुपये एवढे मानधन करण्यात आल्याचा शासन निर्णय निर्गमित करून पोलीस पाटलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटील यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे…
पोलीस पाटील हा गावातील प्रमुख घटक आहे, पोलीस पाटीलांना मिळणारे मानधन हे अतिशय कमी होते हे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते त्या अनुषंगाने सरकारने सकारात्मक पाऊल उचलले असून या निर्णयामुळे राज्यातील पोलीस पाटलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे…राहुल कुल – आमदार, दौंड विधानसभा