पुणेरी टाइम्स टीम-
काऱ्हाटीत महात्मा फुले तरुण मंडळ काऱ्हाटी व श्री जगन्नाथ आय सी यु व एक्सीडेंट हॉस्पिटल बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन काऱ्हाटी येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती ,माननीय श्री गणेश इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री नागनाथ पाटील उपस्थित होते. तसेच जगन्नाथ हॉस्पिटलचे डॉ. विकास लोणकर (एमडी मेडिसिन, हृदयरोग तज्ञ ) व अस्थिरोग तज्ञ डॉ. किशोर रुपनवर यांनी जवळपास 280 रुग्णांची मोफत तपासणी केली. तसेच मोफत गोळ्या व औषधांचेही वाटप हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. उद्घाटनाच्या कार्यक्रमा वेळी मनोगत व्यक्त करताना उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे म्हणाले की महात्मा फुले तरुण मंडळ काऱ्हाटी यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेऊन गावातील गरजू व गरीब रुग्णांना गावांमध्ये या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या काळात चांगली सेवा उपलब्ध करून दिली आहे. अशाच पद्धतीने सर्व गणेश मंडळांनी उपक्रम हाती घेणे गरजेचे आहे. यावेळी बोलताना श्री डॉ. किशोर रुपनवर म्हणाले, श्री जगन्नाथ हॉस्पिटल बारामती यांच्याकडून कायम अशा पद्धतीने काम करणाऱ्या गणेश मंडळांना सहकार्य राहील. यावेळी का-हाटी परिसरातील वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र का-हाटी यांचे सहकार्य या शिबिरासाठी लाभले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत लोणकर यांनी केले सूत्रसंचालन प्रकाश लोणकर यांनी केले व आभार महात्मा फुले तरुण मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य लोणकर यांनी मानले.