पुणेरी टाइम्स टीम…
विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांची असते. मात्र मागील काही दिवसांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत आहे. त्यातच जिल्हा परिषद शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह १०८ अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. खिचडी शिजविण्या पासून मुलांना वाटप करण्यापर्यंतची कामे,मतदार याद्या तयार करणे, जनगणना, पटनोंदणी, विविध प्रकारचे सर्वेक्षण, वृक्षारोपण, शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांचे बँक खाते, आधार कार्ड काढून देणे, पालकांची सभा, शाळा व्यवस्थापन समिती सभा, शाळेची ऑनलाईन माहिती भरणे, यू डायस वर माहिती भरणे, शैक्षणिक अहवाल तयार करणे, शिष्यवृत्ती बाबत माहिती भरणे, शिक्षण विभागाने मागितलेली माहिती पुरविणे, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, प्रत्येक राष्ट्रीय कामात मदत करणे, ही सर्व कामे शाळेतील शिक्षक करीत आहेत शिक्षकांना अवांतर दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत आहे.
या शासनाच्या धोरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी काळा फिती लावून शासनाच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध करण्यात आला आहे.
दौंड तालुक्यात शिक्षक सेवकांनी आपल्या शाळेच्या समोर काळ्या फिती लावून आपल्या गावातील प्रमुख पदाधिकारी यांना अशैक्षणिक कामाच्या विरोधातील निवेदन देण्यात आले आहे.
आम्हाला शिकवू द्या, मुलांच्या मध्ये जाऊ द्या या एकाच मागणीसाठी आपण हे आंदोलन करत असल्याचे पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन आपले मागणे शासनापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांना विनंती केलीय. आज या शिक्षक दिनी अशैक्षणिक कामातून मुक्त करून गुरूदक्षिणा द्यावी असे मत शिक्षक नेते शांताराम जगताप यांनी व्यक्त केले आहे.
दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघ व महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आहे…