पुणेरी टाइम्स टीम दौंड
– दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक वेळा मोठमोठे अपघात, चोऱ्या, केमिकल रॅकेट, ड्रग्स यासारखे उत्पादने नियमबाह्य बेकायदेशीरपणे घेतली जात आहेत. यासारखी धक्कादायक प्रकरणे उघड झाल्यानंतर येथील पोलिसांना दोषी धरण्यात येते. औद्योगिक वसाहतीमध्ये सक्षम उपाय योजना केल्या जात नाहीत. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित उद्योग कार्यरत आहेत. दिवसेंदिवस येथील औद्योगिक क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. या औद्योगिक वसाहतीमध्ये त्याच पटीने गुन्हेगारी, चोरी, तसेच झटपट श्रीमंत होण्यासाठी केमिकल मधून महागडी उत्पादने घेण्याचे उद्योग घडल्याचे येथे उघडकीस आले आहेत. अपुरे पोलीस बळ, अर्धवेळ अधिकारी, गस्तवाहनाचा अभाव यासारख्या गोष्टीमुळे येथील पोलिसांना कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. या अडचणी तातडीने दूर होण्याची आवश्यकता आहे. येथील चौकीला पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणी येथील स्थानिक करीत आहेत. तसेच येथील चौकीला गस्तवाहनाची आवश्यकता आहे, याबाबतची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. सक्षम व प्रभावी यंत्रणा, पोलीस यंत्रणेशी निगडित सुविधा व यंत्रणा राबवल्यास या औद्योगिक वसाहतीमधील व पुणे सोलापूर महामार्गावरील चोरी अपघात यासारख्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात मदत होईल. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी याबाबत दखल घेऊन तातडीने कुरकुंभ पोलीस चौकी बाबत सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे तसेच येथील चौकीला पूर्णवेळ अधिकारी, गस्तवाहन या प्रमुख बाबीची अमंलबजावणी होणे अपेक्षित आहे.