पुणे टाइम्स टीम…(दौंड)
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दौंड मधील राजकारण सध्या तापू लागले आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग येत आहे. दौंड तालुक्यात कुल -थोरात हे दोन तुल्यबळ गट असून मागील काही दिवसांपासून तालुक्यात तिसरा गट आप्पासाहेब पवार व त्यांच्या सहकाऱ्यांच्या साथीने आपले राजकीय अस्तित्व निर्माण करीत आहे. राजकारण होत असताना टोलेबाजी होणे स्वाभाविकच आहे, मात्र विकासावर ही चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र विकासाच्या बाबतीत कुठेही चर्चा होताना दिसत नाही. राजकीय नेत्यांना गटातटातील राजकारण हेच महत्त्वाचे असल्याचे सध्या तरी दिसत आहे. दौंड तालुक्यातील मागील दहा वर्षातील विकास कामे पाहता कुठेतरी दौंडचा रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यात आमदार राहुल कुल यांना यश येताना दिसत आहे. आमदार कुल आपण विकासाची कामे केल्याची दावा करतात. मात्र मागील निवडणुकीत कुल यांना निसटता विजय मिळवता आला. त्यामुळे मतदारांच्या मनातील नक्की काय आहे हे समजणे अवघड आहे. आमदार कुल विकासाच्या मुद्द्यावर मत मागणार असल्याचे बोलतात. तर रमेश थोरात यांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची भूमिका निभावलेली आहे. तसेच आप्पासाहेब पवार यांनीही दौंड पंचायत समितीच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड मध्ये आदर्शवत काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर रंगवल्या जाणाऱ्या चर्चा, टोलेबाजी, फ्लेक्स बाजी वरील मजकूर यावरून दौंडचे राजकारण वेगळ्याच वळणावर चालण्याचे पाहायला मिळत आहे. राजकारणी जरी आपल्या वैयक्तिक पद प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर टोलेबाजी करत असले तरी सर्व सामान्य मतदार विकासाच्या मुद्द्यावर, पक्षाची ध्येय धोरणे, शेतकऱ्यांचे हित, रोजगार, आरोग्य, यावर मतदान करणार असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे हवेत असलेल्या राजकारण्यांनी जमिनीवरून चालण्याची गरज आहे…