पुणे टाइम्स टीम (कुरकुंभ)दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील जिल्हा मार्ग क्रमांक १७७ या मार्गाची सुधारणा करणे कामी ५०५४(०४) जिल्हा व इतर मार्ग मधून जवळपास एका टप्प्याचे जवळपास तीन कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला आहे. याच रस्त्यावर जवळपास टप्पा एक, टप्पा दोन, व तीन साठी एकुण सात कोटी एवढा खर्च होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र यातील एका टप्प्यातील काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामावरती ठिकठिकाणी फक्त चारच महिन्यात खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे या कामांमधून ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड यांचा दर्जा दिसून आला आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खचलेला आहे, त्यामुळे या कामांमध्ये यांत्रिक व तांत्रिक बाबींचा मोठ्या प्रमाणात अभाव झालेला दिसून येत आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांच्याशी संपर्क साधला असता “ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही” मी गणपतीच्या मिरवणुकीत आहे, आपण उद्या बोलु तसेच दोन वर्षात रस्त्याला काही झाली तर त्या ठेकेदाराने दुरुस्त करून द्यायचे असते असे सांगण्यात आले व वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बांधकाम विभागाच्या अनेक कामांत संबंधित कामाची देखभाल व दुरुस्ती त्याच ठेकेदाराकडे आहे असे सांगतात व तक्रारदारांना दिशाभूल करणारी माहिती देतात आणि आपली पोळी भाजून घेतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यामध्ये साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे. निकृष्ट कामाला पाठीशी घालणे हे येथील अधिकाऱ्यांच्या कर्तव्याचा भागच बनला असल्याने येथील अधिकारी हे आपण जनतेचे ‘जनसेवक लोकसेवक’ आहेत याचे भान विसरलेले दिसून येत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवरती वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज आहे. याबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे दखल घेणार का? अशा अधिकाऱ्यांवरती काय कारवाई करणार की, मेहेरबानी दाखवणार असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
