पुणे टाइम्स टीम… दौंड
दौंड तालुक्यातील वासुंदे, जिरेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात खाणमाफियांनी उच्छाद मांडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील खाणमाफीयांनी महापारेषण कंपनीची उच्च दाब वाहिनी 220 केव्ही बारामती कुरकुंभ व कुरकुंभ – शिर्सुफळ या वाहिनीच्या मनोरा क्रमांक 74 व 75 या ठिकाणी येथील खाणमाफियांनी मोठ्या प्रमाणात नियमबाह्य बेकायदेशीरपणे बोअर ब्लास्टिंग करून स्वहितासाठी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन केले आहे. सदरच्या नियमबाह्य उत्खननासाठी महसूल प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. महसूल ने दिलेल्या परवानग्या, अटी शर्ती याचा सर्वत्र भंग झालेला असताना या खाणमाफीयांना कोणाचे अभय आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. येथे स्थानिकांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालेला असताना याबाबत जिल्हा खनीकर्म अधिकारी सुयोग जगताप मुक गिळून गप्प आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होत आहे. सदर प्रकरणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तातडीने दखल घेण्याची गरज आहे. या उत्खननाने अती उच्चदाब विद्युत वाहिनीस धोका निर्माण झाला आहे. याबाबत महापारेषण कंपनीकडून धोक्याची नोटीस दिनांक 05/06/2024 रोजी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतिउच्चदाब वाहिनी देखभाल उपविभाग बारामती यांच्यामार्फत येथील कोहिनूर स्टोन क्रशर, ओम साई ओम क्रेशर, वासुंदे, पांढरेवाडी, जिरेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व खाण व्यवसायिक व क्रशर उद्योगांना देण्यात आले आहे. सदर नोटीसाची प्रत कार्यकारी अभियंता महापारेषण संरक्षण व सुरक्षितता, विद्युत निरीक्षक, महाराष्ट्र शासन – पुणे, तहसीलदार – दौंड, गाव कामगार तलाठी – वासुंदे, जिरेगाव, पांढरेवाडी यांना देण्यात आले आहे. सदरचे नोटीस मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून सोशल मीडियावर शासकीय यंत्रणांवर नाराजीचा सुर उमटत आहे.
या नोटीसामध्ये असे नमुद केले आहे की, सद्यस्थितीला अस्तित्वात असलेल्या मनोऱ्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस साडेसतरा मीटर पर्यंत कोणतेही काम करता येत नाही. मात्र या ठिकाणी सर्व नियमांना खाण व्यवसायिकांनी कात्रजचा घाट दाखवत केलेल्या उत्खननामुळे विद्युत म्हणून त्याचा सापळा अधांतरी झाला आहे. यामुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. या खोदकामाबाबत महापारेषांच्या तपासणी व देखभाल दुरुस्ती करणारे अधिकारी कर्मचारी तितकेच जबाबदार आहेत. याबाबत महापारेषण कडून दक्षता घेतलेली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवरती सेवेत दिरंगाई केल्याबद्दल व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल वरिष्ठांनी कारवाई करण्याची गरज आहे. या कर्मचाऱ्यांच्या कसूराईमुळे महापारेषणचे कोट्यावधी रुपयांची वित्तहानी होणार असून जीवितहानीचाही धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांसह येथील नियमबाह्य बेकायदेशीर उत्खनन करणारे खाण मालक व क्रशर मालकांवरती गुन्हे दाखल करण्याची गरज असल्याचे प्रशासनातील बडे अधिकारी दबक्या आवाजात बोलत आहेत, त्यामुळे महसूल व महापारेषण प्रशासन काय भूमिका घेते हे पाहणे गरजेचे आहे…