केडगाव – कुसेगाव ( ता.दौंड ) येथील गवंड्याच्या मुलीने सेटच्या परीक्षेत बाजी मारली आहे. या मुलीकडे सेटचा फॅार्म भरायला ८०० रूपये नव्हते. सुदैवाने त्याच दरम्यान तीची स्कॅालरशिप आली अन् फॅार्म भरला. पहिल्याच प्रयत्नात तीला यश मिळाले. उच्च शिक्षणासाठी तीला रोटरी क्लब ठाणे यांनी दत्तक घेतले.
कुसेगाव येथील ललिता रमेश चव्हाण असे या मुलीचे नाव आहे. रमेश चव्हाण हे गवंडी काम करतात. २०१७ मध्ये रमेश यांच्या पोटावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांच्या कामावर मर्यादा आल्या आहेत. आई सुधा या शेतमजूर आहेत. दोन मुलांच्या शिक्षणाचा, कुटुंबाचा खर्चाचा भार सुधाबाई यांच्यावर आहे. रायगडमध्ये चांगली मजुरी मिळेल सांगाव्यावर त्यांनी कुसेगाव येथून स्थलांतर केले पण तेथे त्यांची निराशा झाल्याने ते पुन्हा कुसेगाव येथे आले. रायगडमध्ये असताना रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी ललिताला उच्च शिक्षणासाठी दत्तक घेतले. ललिता म्हणते रोटरी नसते तर माझे शिक्षण केवळ अशक्य होते. दहावी, बारावी, बीए, एमए या सर्व परीक्षेत ललिताला डिस्टिंग्शनमध्ये मार्क आहेत. तिचा इंग्रजी हा विषय स्पेशल आहे. ललिता अजूनही आई बरोबर खुरपणी, कांदा काढणी अशी कामे करत आहे. शेतात मजुरीचे काम, घरी आल्यावर आईला घरकामात मदत. त्यानंतर उरलेल्या वेळेत अभ्यास असा ललिताचा दिनक्रम आहे. तीला स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी व्हायचे आहे. सेट परीक्षा हा तीचा ‘बी’ प्लॅन आहे. ललिताचे वय आता २४ असल्याने लग्नासाठी नातेवाईक पालकांच्या मागे लागले आहेत. परिस्थिती बिकट असल्याने चांगली स्थळे येत नाहीत. लग्नाच्या आग्रहाचा ललिताचा अभ्यासात खूप अडथळा येत आहे.
ललीता म्हणते, ”घरच्या बिकट परिस्थितीमुळे शिक्षण घेत असताना फार तडजोडी केल्या. किरकोळ खर्चासाठी आईला पैसे मागत येत नव्हते. म्हणून मजुरी काम केले. मला प्राध्यापक किंवा पीएसआय होऊन कुटुंबाला सुखी ठेवायचे आहे. ध्येय प्राप्तीशिवाय लग्न करणार नाही.”
ललिताचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा, भानोबा विद्यालय कुसेगाव, छत्रपती कनिष्ठ महाविद्यालय, खालापूर, सुभाष कुल महाविद्यालय केडगाव, एकनाथ दिवेकर महाविद्यालय वरवंड येथे झाले आहे.
चौकट…
सेट परीक्षेमुळे पिंपरी-चिंचवड येथे नातेवाईकांकडे एक दिवस आधी भावाबरोबर जात होते. भावाने तिकीट काढले मात्र गर्दीत तिकीट गहाळ झाले. प्रवासात बसची तपासणी झाली. भावाला तिकीट सापडेना. त्यावेळी आम्हाला ५०० रूपयांचा दंड झाला. तेव्हा खूप वाईट वाटले. ५०० रूपये आमच्यासाठी फार मोठी रक्कम आहे.
ललिताचा सत्कार करताना सुभाष कुल महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार जाधव यांच्या हस्ते करण्यात आला आहे, ललिताचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे…