पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)
दौंडच्या कुसेगाव ग्रामपंचायत मधील शासकीय कामातील सावळा गोंधळ समोर आला आहे. ग्रामसेवकांनी केलेल्या या कामामुळे सध्या कुसेगाव व येथील ग्रामसेवक भलतेच चर्चेत आले आहेत. कुसेगाव तालुका दौंड येथील ग्रामसेवक सोमनाथ थोरात यांच्याकडे कुसेगावचे माजी सरपंच व वनश्री पुरस्कार प्राप्त, मनोज फडतरे यांनी केलेल्या तक्रारी अर्जाबाबत ग्रामसेवक थोरात यांनी एकाच प्रकरणात आपले दोन वेगवेगळी मते पत्राद्वारे फडतरे यांना कळवली आहेत.
फडतरे यांनी दिनांक ३०/०५/२०१४ रोजी सभामंडपा भोवती अतिक्रमणाबाबत ग्रामसेवक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीबाबत ग्रामसेवक यांनी दिनांक २८/०५/२०२४ व दिनांक १०-६-२०२४ रोजी फडतरे यांना लेखी खुलासाही दिला, मात्र ग्रामसेवक यांनी एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे खुलासे दिल्याने दोन्ही पत्रात भिन्नता दिसून येत आहे.
फडतरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार असणाऱ्या कलमांच्या आधारे कोणतीही नोटीस किंवा कारवाई केलेली दिसून आली नाही, तसेच एका तक्रारीत दोन वेगवेगळी मते नोंदवून नेमून दिलेली कर्तव्य व शासकीय काम पार पडण्यात जाणून बुजून हेतू परस्पर कोणाला तरी वाचवण्यासाठी विलंब लावलेला आहे. व या प्रकरणी दुर्लक्ष केले असून कर्तव्य पालनात कसूर केली आहे असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदर ग्रामसेवक यांच्यावरती दप्तर दिरंगाई कायद्याने व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याची मागणी मनोज फडतरे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे ग्रामसेवक यांच्या या प्रकरणाबाबत वरिष्ठांकडून काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे आहे… मात्र गावांमध्ये हा विषय मोठा चर्चेचा बनला असून शासनाचे सेवक अतिक्रमणाला पाठीशी घालत असतील तर न्याय मागायचा कोणाकडे असाही सवाल येथील नागरिकांना पडला आहे. मात्र या प्रकरणी गटविकास अधिकारी यांच्याकडून ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.