ठळक बातम्या

आमदार राहुल कुल कुरकुभं एमआयडीसीतील “प्रदुषणाबाबत आक्रमक” कामगार मंत्री याच्या उपस्थितीतील बैठकीत केल्या विविध मागण्या, अधिकाऱ्यांना धरले धारेवर…श्री सिमेंट कंपनीला “शिवसंग्रामचे नेते वसंत साळुंखे” यांचा इशारा अन्यथा…कुरकुंभ पोलीस चौकीला स्वतंत्र पुर्णवेळ अधिकाऱ्याची गरज, गस्तीसाठी अतिरिक्त वाहनाची आवश्यकता… “पी एम किसान” योजनेचे पैसे बंद झालेत, थेट दौंडच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील ‘पी एम किसान कक्ष अधिकारी सोमनाथ देसाई’ यांच्याशी संपर्क साधा -9561474001मोबाईलवर “PM किसान” ची ‘APK फाईल’ आलीय तर बैंक खाते होवू शकते रिकामं, कृषी विभागाने केलंय हे महत्त्वाचे आवाहन – ही घ्या काळजी…

दौंड मध्ये ‘घड्याळाची’ नुसतीच टिकटिक, तर ‘कमळही सलाईनवर’ मतदारांच्या ‘अंडर करंट’ वर तुतारीचा आवाज घुमणार? पत्रकार नरेंद्र जगताप यांच्या लेखणीतून विशेष विश्लेषण…

पुणेरी टाईम्स विशेष विश्लेषण…

बारामती लोकसभा (२०२४)मतदारसंघाचे दौंड तालुक्याचे निवडणूक विश्लेषण ….

तुम्ही मला मते द्या,मी बारामती सारखा दौंडचा विकास करून दाखवतो, घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत, देशाच्या विकासाला मत या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनाला दौंडकरांनी तितकेसे गांभीर्याने घेतले नाही. २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघामध्ये एक अंडर करंट होता. मतदार बोलत नव्हते परंतु त्यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा ठाम निश्चय केला होता. सगळा पक्ष गेला, चिन्ह गेले, सगळं गेलं तरी न डगमगता उभ्या राहणाऱ्या शरद पवार यांच्यासाठी आम्ही मतदार तुमच्या बाजूने आहोत आणि साथ देणारच अशी सार्वत्रिक भावना निर्माण झाली होती. दौंड तालुक्यात तर भाजपचे विद्यमान आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, प्रेमसुख कटारिया, नंदू पवार यांच्यासह नेते, ठेकेदार,वाळू व मुरूम यांचा बेकायदा उपसा करणारे, सत्ताधारी गटाचे लाभार्थी व गावपुढाऱ्यांचा फौज फाटा महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी अतिआत्मविश्वासाने प्रचार करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी निवडक पदाधिकारी व काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,आप यासह मित्र पक्षाच्या मोजक्या कार्यकर्त्यांसह खिंड लढवली व दौंड तालुक्यातून मतदारांच्या सहानुभूतीवर मताधिक्य मिळवले. जनतेने निवडणूक हातात घेतली म्हणजे नेमके काय याचे उदाहरण म्हणजे बारामती लोकसभा मतदार संघातील सुप्रिया सुळे यांचा सलग चौथा विजय.

राहुल कुल आणि रमेश थोरात यांचा गट एक दिलाने एकत्र आला नाही. गावागावात कार्यकर्त्यांनी कुस्ती करायची आणि वरच्या नेत्यांनी दोस्ती करायची. एकमेकांना पेढे भरवायचे हेही कट्टर कार्यकर्त्यांना रुचले नव्हते. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये डावलेले गेल्याची भावना दृढ झाली होती. ओबीसी पर्वचा दौंड तालुक्यातील उमेदवार हा दुर्लक्षितच राहिला. महेश भागवत यांना दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या तुलनेत अगदीच नगण्य मते मिळाली.

२०१४ व २०१९ च्या दोन लोकसभा व दोन विधानसभा अशा एकूण चार निवडणुकांमध्ये दौंड तालुक्यातून घड्याळाची टिकटिक मतदारांनी थांबवली होती. यावेळी खुद्द खासदार सुप्रिया सुळे यांनीच घड्याळाची टिकटिक पुन्हा चालू होण्यापासून रोखले. मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये दौंड तालुक्यामधून सुप्रिया सुळेंसाठी नकार घंटा वाजत होती परंतु यावेळी चिन्ह बदलल्यामुळे सुप्रिया सुळे यांना खूप मोठी आघाडी दौंड तालुक्याने दिली आहे. घड्याळ या चिन्हा पेक्षा तुतारी फुंकणारा माणूस हे अधिक शुभ असल्याचे सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

ठळक मुद्दे :- – आमदार राहुल कुल व त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार व अजित पवार यांचे एकनिष्ठ रमेश थोरात हे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी एकत्र आले होते. परंतु सुप्रिया सुळे यांच्या दौंड तालुक्यातील मताधिक्यावरून कुल व थोरात यांचे कार्यकर्ते व त्यांना मानणारा वर्ग एकत्र आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळ भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी काय करते आणि शरद पवार यांचा वरदहस्त कोणाच्या डोक्यावर राहतो. निवडणूक दुरंगी तिरंगी की चौरंगी होते. लोकसभा निवडणुकीसाठी निर्णायक ठरलेला दलित,मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार कमळाच्या चिन्हाला मतदान करेल का?यावर आगामी विधानसभेची गणिते अवलंबून आहेत.

२०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट आणि धनगर आरक्षणाचा तापलेला मुद्दा याच्या जोरावर महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर २५ हजार ५४८ मतांची आघाडी दौंड तालुक्यातून घेतली होती.

२०१९ च्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आमदार राहुल कुल यांच्या पत्नीकांचन कुल या दौंडच्या स्थानिक उमेदवार असतानाही त्यांना केवळ सात हजाराची आघाडी सुप्रिया सुळे यांच्यावर घेता आली होती.

कांचन कुल यांना ९०हजार ७८९ ईव्हीएम मते व सुप्रिया सुळे यांना ८३ हजार ७६५ ईव्हीएम मते मिळाली होती.

२०१४ आणि २०१९ मध्ये सुप्रिया सुळे यांनी घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.

२०२४ च्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना 92 हजार ०६४ ईव्हीएम मते तर सुनेत्रा पवार यांना ६५ हजार ७२७ ईव्हीएम मते मिळाली सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यातून २६३३७ मतांची (पोस्टल मते सोडून)आघाडी मिळाली.

दौंड मधील सर्व राजकीय पुढारी एकत्र येऊनही सुनेत्रा पवार यांना मताधिक्य मिळाले नाही. उलट सुप्रिया सुळे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले. त्यामुळे दौंड मधील मतदारामध्ये असणारा अंडर करंट असाच राहिला तर याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात दौंडचे चित्र विधानसभेसाठी वेगळे असू शकते.  राजकारणात केव्हाही काही होऊ शकते असे बोलले जाते, मात्र याचा प्रत्यय दौंडमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही… दौंड तालुक्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला न मानता कूल थोरात यांना मानणारे मोठे गट आहेत. तरी सुद्धा येथील मतदार यांनी सुळे यांना मतदान मोठ्या प्रमाणात करीत राजकीय उलथापालथ केल्याने विधानसभेला ही राजकीय उलथापालथ कोणाच्या पथ्यावर पडणार हे महत्त्वाचे आहे…(नरेंद्र जगताप – दौंड)

Leave a Comment

पुणे जिल्हा परिषदेचे “कार्यकारी अभियंता” व ‘उपअभियंतासह’ दौंडच्या पंचायत समितीच्या ‘महिला अभियंत्यांच्या’ लाच खाण्याने जिल्ह्यात “बोंबाबोंब” जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्क्रियता चव्हाट्यावर…

[adsforwp id="47"]