पुणेरी टाइम्स टीम (इंदापूर)
सद्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभेच्या सर्वच टप्प्यातील निवडणूका पार पडलेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काहीच तासांवर येऊन ठेपली असताना देशभरात निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मात्र संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघातील इंदापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मात्र सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा ठाम विश्वास असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच निकाला आधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. इंदापूर शहरातील ओबीसी सेलचे शहराध्यक्ष मयूर मोहन शिंदे यांनी हे बॅनर लावलेले आहे.. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेचा मुद्दा बनली होती. त्यामुळे निवडणूकीत इंदापूर तालुक्यात हाय व्होल्टेज ड्रामा पहावयास मिळाला होता. दरम्यानच्या काळात ऐन निवडणुकीच्या दिवशीच आमदार दत्तात्रय भरणे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला केलेल्या शिवीगाळी नंतर वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे अजित पवार यांची राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती..
मात्र याच इंदापूर मध्ये आता निकालाच्या तीन दिवस अगोदरच सुप्रिया सुळे यांच्या विजयी झाल्याच्या बॅनर लागल्याने एकच खळबळ उडाली आहे…सध्या हा बॅनर चर्चेचा विषय बनलेला असून याचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.