पुणेरी टाइम्स टीम…(दि.२३) दौंड शहरातील अतिक्रमणांवर दौंड पोलिसांनी कारवाया करण्याचे सत्र सुरु केले आहे. आता दौंड शहरामधील सरपंचवस्ती येथे गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी चौकाचौकात कित्येक वर्षांपासून करण्यात आलेल्या अतिक्रमणावर दौंड पोलिसांनी कारवाई करत दौंडकरांना दिलासा दिला आहे. दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हाती घेतलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी इथल्या अनेक सार्वजनिक ठिकाणांचा श्वास मोकळा केला आहे.यामध्ये संविधान चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावरील रस्त्यालगतची अतिक्रमणे काढली होती.सरपंचवस्ती येथे गोपळवाडी रोडवर वर्षानुवर्षे फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते,मच्छी विक्रेते तसेच चायनीज गाडे व इतर अनेक प्रकारच्या दुकानदारांनी रस्त्यावरच अतिक्रमण केले होते.त्यांनी केलेल्या अतिक्रमाणामुळे रस्त्यावर वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत होती. याचा सर्वसामान्य नागरिक व वाहनचालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या अतिक्रमणाकडे दौंड पोलिसांनी लक्ष करत अखेर या अतिक्रमाणावर हातोडा मारला आहे. तसेच कुरकुंभ एमआयडीसी वरून सरपंच वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर बसेस कामगारांना घेऊन येत असतात. बस आल्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सरपंचवस्ती रस्त्याने मोठ्या ६०ते ७० बसेस प्रतिदिनी वाहतूक करत होत्या त्यामुळे सायंकाळी मोठ्या प्रमाणात ३ ते ४ तास वाहतुकीची पूर्णपणे कोंडी होत होती.त्यामुळे इथल्या सर्व बस वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या कारवाईने सरपंचवस्ती येथील ठिकाणांनी मोकळा श्वास घेतला आहे. कित्येक वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणे मोकळी झाल्याने दौंडकरांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया, दुरंदे तसेच सहाय्यक फौजदार सुरेश चौधरी, बबन जाधव, पो.ह.पांडुरंग थोरात, पो.ना. नितीन चव्हाण ,विशाल जावळे, पो.कॉ. योगेश पाटील, अक्षय घोडके, इंद्रजीत वाळुंज, आमिर शेख आदींनी केली आहे.
छोटे तसेच मोठे व्यावसायिक यांनी व्यवसाय करावा परंतु सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागू नये याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. – चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन