पुणेरी टाइम्स टीम…दौंड शहरात शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा महासंघाच्यावतीने शिवजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. महिला भगिनींनी शिवजन्माचा पाळणा गायला. विविध पक्षांच्या पदाधिकारी व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. शनिवारी सायंकाळी शिवकालीन दवंडी देण्यात आली. शिवराय मनामनात,शिवजन्मोत्सव घराघरात अंतर्गत शिवजन्मोत्सव सजावट व १४ वर्षाखालील मुलामुलींची शिवकालीन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
शिवरायांना लेझीम या खेळा द्वारे अभिवादन व मानाचा मुजरा करण्यात आला. राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविजचे प्राचार्य रामचंद्र केंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र क्रमांक ६५ च्या प्रशिक्षणार्थींनी अतिशय तालबद्ध व आकर्षक पद्धतीने लेझीमचे सादरीकरण केले याला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. या शिवाय दौंड शहर व परिसरातील विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी चित्ररथ व जिवंत देखावा आणि पालखी सोहळा सादर केला.