पुणेरी टाइम्स टीम (दौंड दि.८)
_सुरक्षेबाबत सर्व विभाग प्रमुखांची पोलीस निरीक्षकांनी घेतली बैठक_
‘दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्य अभियंता,सर्व कंपनी व्यवस्थापक, कंपनीचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची औद्योगिक वसाहतीत दि.७ रोजी बैठक घेतली.वसाहतीत असणाऱ्या अनेक अडचणी, असुरक्षितता, चोऱ्या, लूटमार, आपत्कालीन सुरक्षिततेचा अभाव, ठेकेदारीसाठी ब्लॅकमेलिंग, मारहाण, दमबाजी आदी बाबींचा आढावा घेत यासंदर्भात आवश्यक सूचना केल्या.
यामध्ये कंपनीच्या संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही बसवणे, सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीमध्ये गरजेप्रमाणे सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे, कंपनीच्या परिसरात आणि तेथील अंतर्गत रस्त्यांवर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रमाणात लक्ख प्रकाश राहील यासाठी पथदिवे बसवणे, कंपनीतील मालाच्या अनेक प्रकारच्या ठेकेदारीसाठी कुणाकडून ब्लॅकमेलिंग व दमबाजी होत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवणे, कंपनी परिसरात व कंपनीत चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त सिसिटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, अनेक कारणास्तव कंपनीत अचानक आग लागते अशावेळी ही आग संपुष्टात आणण्यासाठी फायर यंत्रणा कार्यान्वित व अध्ययावत ठेवणे आदी सूचना देऊन दौंड पोलिसांनी कंपनीच्या सुरक्षिततेविषयी लक्ष घातले आहे.
घेण्यात आलेल्या या बैठकीसाठी कुरकुंभ एमआयडीसीचे मुख्य अभियंता ए.बी.पाटील, अलकाइल अमाईन्स, ऑनर लॅब, ईटर्निस फाईन केमिकल्स, सुयश ऑरगॅनिक, क्लीन सायन्स, शोगन ऑरगॅनिक या व इतर कंपन्यांचे ३५ प्रतिनिधी, कंपनी व्यवस्थापक प्रतिनिधी, एम आय डी सी चे अधिकारी उपस्थित होते.
व्यावसायिकांना त्रास दिल्यास दौंड पोलिस गुन्हे दाखल करणार! ‘औद्योगिक वसाहतीत चोऱ्या, दरोड्यांच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. हे टाळण्यासाठी दिलेल्या सूचनांचे सर्वांनाची पालन करावे व अधिकची काळजी घ्यावी. कंपनीच्या संबंधित फायद्यासाठी कुणी ब्लॅकमेलिंग-दमदाटी करत असेल, येथे काम करणाऱ्या कर्मचारी, व्यवस्थापक यांना नाहक त्रास देत असेल तर दौंड पोलिस तक्रारीवरून गुन्हा दाखल करून कारवाई करतील. असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाही.तशी तक्रार आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक दौंड