पुणेरी टाइम्स टीम…
मलठण तालुका दौंड येथील ग्रामसेवक हे गेली आठ दिवसापासून आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजरच नाहीत, त्यांना संपर्कासाठी गावातील ग्रामस्थ गेली आठ दिवसापासून संपर्क करीत आहेत. मात्र ते मीटिंगसाठी बाहेर आहे, इकडे आलो आहे तिकडे आलो आहे अशी उत्तरे देत आहेत. तसेच तास अर्धा तास गावात येतात किंवा रजेवर असल्याचे कारण देत आहेत. व मोबाईल बंद करून ठेवत आहेत. याबाबत दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्याशी संपर्क साधला असता सदर ग्रामसेवक हे रजेवर नाहीत अशी माहिती देण्यात आली, तसेच कोणतीही मीटिंग नसल्याचेही सांगितले त्यामुळे सदरचा ग्रामसेवक हा शासकीय सेवेत दिरंगाई करीत असल्याचे उघड झाले आहे. ग्रामसेवकांना आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी निवासी राहण्याचा शासन निर्णय बंधनकारक असताना सदरचा ग्रामसेवक हा शहरी ठिकाणी राहतो व शासनाच्या निर्णयाला हरताळ फासत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नागरी सेवा देण्यापासून गावातील ग्रामस्थांना वेठीस धरले जात आहे. सदरचा ग्रामसेवक हा कार्यालयीन दप्तर व कार्यालयाच्या चाव्या घेऊन गेल्याने अनेक नागरिक आपल्या कामासाठी ग्रामसेवकाच्या शोधात आहेत. त्यामुळे या भाऊसाहेबाची निष्क्रियता व वेळकाढूपणा ग्रामस्थांच्या अंगाशी आला आहे, मात्र याबाबत वरिष्ठ सुस्त आहेत. काम न करणाऱ्या या ग्रामसेवकावरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे ग्रामसेवकाला राजकीय राजाश्रय आहे की, प्रशासनातील अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत हा विषय गावात चर्चेचा बनला आहे. मात्र संबंधित अधिकारी हा आपल्या तोऱ्यात वावरत असल्याने वरिष्ठ काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
