कृषीपंप व वाहन चोरीतील आरोपींना अभय? भिगवण पोलिसांच्या आर्थिक तडजोडीची चर्चा

पुणेरी टाइम्स : इंदापूर
इंदापूर तालुक्यातील भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या विहिरीमधील कृषी पंपाची चोरी केल्याप्रकरणी भिगवण पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली होती. यातील दोन आरोपींकडून आर्थिक तडजोड करून सदर दोन आरोपींवर नाममात्र कारवाई केल्याची घटना घडली असल्याची जोरदार चर्चा भिगवण परिसरात चालू आहे.
याबाबत माहिती अशी की भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाळज नं.२ गावातील भादलवाडी तलावालगत शेतकऱ्याच्या विहिरीवरील १२.५ एचपीच्या कृषी पंपाची चोरी केल्याची तक्रार २१ जुलै रोजी भिगवण पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदरची तक्रार दाखल होण्याच्या दोन दिवस अगोदरच भिगवण पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना चार आरोपींना ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्यात चार आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांकडून दोन दिवस कसून चौकशी केली होती. सदर आरोपींनी कृषी पंप व दुचाकी चोरीबाबत पोलिसांना गुन्हा केल्याबाबतची माहिती दिली होती. यावेळी कृषी पंपाची चोरी करून तांब्याच्या तारांची खरेदी करणाऱ्या भिगवण येथील एका भंगार दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी भंगार दुकानातून तांब्याच्या तारा नसलेल्या एकूण १९ कृषी पंप पोलिसांनी जप्त केल्या होत्या.
यावेळी भिगवण पोलिसांनी चार मधील दोन आरोपींवर कृषी पंप चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. तर इतर दोन आरोपींकडे चोरीच्या तीन दुचाकी मिळून आल्या तरी त्या दोन आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल न करता नाममात्र गुन्हा दाखल केला आहे. तसेच कृषी पंप जप्त केलेल्या भंगार दुकानदाराला मोठी आर्थिक तडजोड करत मोकाट सोडून दिल्याचा प्रकार घडला आहे. गस्तीवेळी चार संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर दोन आरोपींवर चोरीचा गुन्हा दाखल करून इतर दोन आरोपींवर नाममात्र कारवाई का ? चोरीची तीन दुचाकी वाहने व इतर वस्तू दोन आरोपींकडून ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल न करता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल कसा झाला ? कृषी पंपांच्या तांब्याच्या तारा खरेदी करणाऱ्या भंगार दुकानदाराला का सोडून देण्यात आले ? हस्तगत मुद्देमालामध्ये फिर्यादी यांचा कृषी पंप का नव्हता ? भंगार दुकानातून हस्तगत १९ कृषी पंप जप्त केल्यानंतर संबंधित दुकान मालकाला आरोपी का करण्यात आले नाही ? असे अनेक प्रश्न नागरिकांमध्ये व शेतकर्यांमध्ये उपस्थित केले जात आहेत.
यावेळी नाममात्र कारवाई केलेल्या दोन आरोपींकडून मोठी आर्थिक तडजोड केली असून तर भंगार दुकानदाराकडून आर्थिक उलाढाल करीत भिगवण पोलिसांनी खिसे गरम करण्यासाठी डीफाॅल्टमुळे बदली झालेल्या एका कर्मचाऱ्याने प्रयत्न केले असल्याची चर्चा भिगवण परिसरात दबक्या आवाजात चालू आहे. तसेच भंगार दुकानामध्ये एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याची भागीदारी असल्याने भिगवण पोलिसांनी सदर भंगार दुकानदाराकडून आर्थिक लाभ घेत मोकाट सोडून दिले आहे का असे आरोप केले जात आहेत.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातून केली जात आहे.


लोकांमध्ये चुकीची चर्चा चालू असून सदर प्रकरणात कोणतीही आर्थिक तडजोड करण्यात आली नाही. तक्रार दाखल दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकरणात चार आरोपींना ताब्यात घेतले होते. यामधील दोन आरोपींकडून चोरीच्या तीन दुचाकी ताब्यात घेतलेल्या वाहनांची तपासणी चालू आहे. तसेच कृषी पंप हस्तगत केलेल्या भंगार दुकानदाराला आरोपी करण्यात आले आहे.
– दिलीप पवार
(सहायक पोलीस निरीक्षक, भिगवण पोलीस ठाणे)

Leave a Comment

[adsforwp id="47"]