पुणेरी टाइम्स टीम… (दौंड)
भीमा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा काल दुपारी एक वाजता कारखाना स्थळावर पार पडली आहे. या सभेनंतर दौंड तालुक्यातील भीमा पाटस कारखान्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना अद्यापही सहकारी तत्त्वावर चालू असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष तथा आमदार कुल यांनी सांगितले. याबाबत कोणीही गैरसमज पसरू नये. कारखाना सहकारी तत्त्वावर चालू असल्यानेच आपण कारखाना स्थळावर सभा घेऊ शकलो असे आमदार कुल यांनी यावेळी सांगितले.
ही सभा सुरू होताच दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.मधुकाका शितोळे यांचा अहवालात फोटो छापल्याबद्दल व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्याचे मंजूर केल्याबद्दल कूल व त्यांच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले. तदनंतर नामदेव ताकवणे, राजाभाऊ तांबे, वसंत साळुंखे, वैशाली नागवडे, दीपक दिवेकर, तात्यासाहेब ताम्हणे, राजाभाऊ कदम आदींनी आमदार कुल यांना प्रश्न विचारत घेरण्याचा प्रयत्न केला. तर बापू भागवत यांनी दौंड सत्र न्यायालय, पुरंदरचे प्रांत कार्यालय दौंड येथे सुरू केलेबाबत कारखान्याचे चेअरमन तथा आमदार राहुल कुल यांच्या अभिनंदनाचे ठराव मांडले. मात्र आमदार कुल यांनी या सर्व प्रश्नांना उत्तर देत तब्बल अडीच तास सभा चालवली. या सभेदरम्यान विरोधकांच्या पॅकेटमध्ये बसलेल्या काही सभासदनेत्यांनी विरोधकांमध्ये बसूनच संचालक मंडळातील काही सदस्यांना खुणावत होते. मला बोलू द्या मी तुमच्यासारखे बोलतो, एवढे बोलून मला घरी जायचे आहे! असे सांगत होते त्यामुळे हे नक्की विरोधक आहेत की कुल यांच्या संचालक मंडळासाठी चेलेगिरी करणारे चेलेचपाटे आहेत हे मात्र समजले नाही. विरोधकांमधून कोणीही कुल व संचालक मंडळाला कारखाना, ऊस दर, सभासदांना दिवाळीसाठी साखर, आगामी गळीत हंगामातील गाळपाचे उद्दिष्ट यावर धारेवर धरू शकले नाही. हे येथील सभासदांचे दुर्दैव आहे. रमेश थोरात यांनी वेळात वेळ काढून संपूर्ण सभा होईपर्यंत या ठिकाणी ठाण मांडले होते, त्यामुळेच एवढा वेळ सभा चालली असे अनेक सभासदांचे मत आहे. रमेश थोरात यांनीही सहकारातील दांडगा अनुभव असतानाही कुल व संचालक मंडळ यांना घेरण्याचा कुठेही प्रयत्न केलेला दिसला नाही.
कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी उत्तरार्थ बोलताना कारखाना राज्य सहकारी बँक व पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रावरच राज्य सहकारी बँकेने हा कारखाना निराणी ग्रुपला चालवायला दिला असल्याचे सांगितले. त्यामुळे थोरात यांनाही संपूर्ण प्रक्रिया माहीत होती. मात्र सभेमध्ये थोरात यांनी कारखाना प्रशासन संचालक मंडळ व निराणी यांच्यामध्ये झालेला करार मागितला त्यावेळी कुल यांनी हा करार राज्य सहकारी बँकेकडे व पुणे जिल्हा सहकारी बँकेकडे उपलब्ध असल्याचे सांगितले. हा कारखाना खाजगी व्यक्तीकडे चालवायला जात असताना बँकेची देणे थकल्यामुळे दिला असल्याचे कुल यांनी यावेळी लक्षात आणून दिले व या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँक यांनी बँकेचे हित पाहिले मात्र कारखान्याचे हित पाहिलं नाही हे कुल यांनी उपस्थित सभासदांच्या लक्षात आणून दिले. तद्नंतर चेअरमन कुल यांनी बँकेनी त्यांची भूमिका पार पाडली असे सांगून थोरात यांना सावरण्याचा प्रयत्न केला.
विषय पत्रिकेतील नंबर एकच्या विषयावर बोलण्यासाठी ताम्हाणे यांनी माईक हातात घेत माइक चालू करा मला बोलायचे आहे म्हणून इशारे केले. मात्र काही मिनिटाच्या आत विषय पत्रिकेतील विषय मंजूर करण्यात आले. बोलण्यासाठी माइक सुरू झाला नाही तेव्हा त्यांनी हातातील माईक स्टेजच्या समोरील मोकळ्या जागेत फिरकला. आमदार कुल यांच्या कार्यकर्त्यांना टोळी संबोधले त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तदनंतर राजाभाऊ कदम यांनी चेअरमन यांना आपण सर्वांना आदराने बोलावे असे सूचना करत सभासदांनी चेअरमन यांनाही आदरानेच बोलावे असे सांगितले तद्नंतर चेअरमन यांनी प्रत्येक सभासदाला आदराने बोलत बोलण्याची संधी दिली.
कारखान्याचे व सभासदांचे हित महत्त्वाचे असताना विरोधक मात्र वैयक्तिक ‘उनी-धुनी’ काढण्यापर्यंत पोहोचले, कारखान्याचे चेअरमन कुल यांनीही माझ्याकडे सर्वांची माहिती उपलब्ध आहे मीही त्यावर बोलू का असे बोलत एक कुटुंबिक उदाहरणही दिले. त्यामुळे विरोधात असलेल्या मंडळींना राजकारण महत्त्वाचे आहे की तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व सहकारी संस्थांचे हित हे मात्र उपस्थित असलेल्या सभासदांना अद्याप समजले नाही…
पाणी प्रश्नावर बोलताना पाणीच नाही आले तर कारखान्याला काय कुसाळं घालणार का?असे आमदार राहुल कुल यांनी वक्तव्य केल्याने आमदार कुल यांचा यावेळी काहीसा तोल गेल्याचे जाणवले. शेजारील तालुक्यातील कारखान्यांची परिस्थिती व आर्थिक स्थिती आमदार कुल यांनी सांगितली यावेळी तांबे यांनी शेजारील कारखान्यांच्या चेअरमनच्या घरांवरती जप्ती आहेत आपले घर पण जप्त करायचे का असे वक्तव्य केले यावेळी उपस्थित सभासदांनी ‘वाळूचोर’ ‘वाळूचोर’ अशा घोषणा दिल्या. सभा तब्बल अडीच तास चालवल्याने सभासदांच्या मनातही समाधान निर्माण झाले. उसाच्या दराची कोंडी इतर कारखान्या बरोबरच फुटली जाईल, मागील हंगामातील दरही आपण ‘एफआरपी’ पेक्षा जास्त दिला आहे. असेही चेअरमन यांनी सांगितले.
विरोधकांकडे संचालक मंडळ यांना धारेवर धरण्यासाठी जरी तांत्रिक मुद्दे नसले तरी विरोधांची एकजूट, आक्रमकता पाहता भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याचे दिसून आले आहे.