पुणे टाइम्स टीम…(दौंड)
दौडमध्ये विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. यामध्ये यामध्ये कोणताच नेता मागे राहिलेला दिसत नाही. दौंड मध्येही निवडणुकीचे वातावरण भलतेच तापू लागले आहे. दौंड मधून विधानसभेसाठी राहुल कुल व त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी रमेश थोरात यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर आप्पासाहेब पवार, राजाभाऊ तांबे, वसंत साळुंके, बादशहा शेख हेही दौंड विधानसभेमधून चर्चेत आहेत. आमदार कुल यांनी नुकतेच महाआरोग्य शिबिर तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या माध्यमातून आमदार कुल यांनी हजारो रुग्णांशी व शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. तर रमेश थोरात यांनी गाव भेट, घोगंडी बैठका, वैयक्तिक बैठकी यावर सपाटा लावला आहे. याचा सर्वत्र गाजावाजा आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र शरद पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले आप्पासाहेब पवार व त्यांचे सहकारी यांचेही काम तितक्या जोमाने सुरू आहे, मात्र त्यांनी अद्यापही कुठेही मोठा गाजावाजा केलेला दिसत नाही. सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना आप्पासाहेब पवार धावून जात आहेत, त्यांनीही दौंडच्या राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
तर राजाभाऊ तांबे आणि वसंत साळुंखे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दौंड विधानसभेची उमेदवारी मागणी केलेली आहे असे खात्रीलायक समजते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नुकतेच राजाभाऊ तांबे यांनी दौंड तहसील कार्याल व पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदनही दिले आहे. तर वसंत साळुंखे यांनी मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी वारंवार महसूल प्रशासनाशी संपर्क करून दौंड मधील कुणबी नोंदी बाबत प्रशासनाला वेठीस धरत दाखले देण्यास भाग पाडले आहे. दौंड शहरातून सलग तीस वर्ष नगरसेवक पदावर राहून शहरवासीयांची सेवा करीत असलेले बादशहा शेख यांनी आपण विधानसभेसाठी प्रस्थापितांना शह देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे दौंड विधानसभा मतदारसंघातील वातावरण तापु लागले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत दौंड मधून ‘प्रस्थापितांना’ शह देण्यासाठी ‘विस्थापित’ राजकारणी एकत्र येवून प्रस्थापितांविरोधात लढणार की, पुन्हा प्रस्थापितांच्या मागे जाणार हे आगामी काळात पाहायला मिळणार आहे.