पुणेरी टाइम्स टीम…
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांनी प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे साठवून ठेवलेले रसायनयुक्तयुक्त पाणी पावसाच्या पाण्याबरोबर सोडले आहे. ते पाणी ओढ्याने वाहत जाऊन मळद येथील तलावात मिसळल्याने मळद तलावातील हजारोच्या संख्येने मासे व जलचर मृत्यूमुखी पडले असून या मेलेल्या माशांचा खच तलावाच्या किनाऱ्याला लागला आहे. मोठ्या प्रमाणात मेलेले मासे सडू लागल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील पाण्याचे चांगले स्त्रोत खराब होत आहेत.
मळद येथील तलाव अनेक दिवसापासून पावसाअभावी कोरडा पडत चालला होता. मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने या पावसाच्या पाण्याबरोबर कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील अनेक रासायनिक कंपन्यांनी त्यांच्या आवारात साठवून ठेवलेले दूषित पाणी ओढ्या नाल्यात सोडले हे पाणी ओढ्याद्वारे मळ्याच्या तलावात पोहोचले व तलावातील माशांसह इतर जलाचारांना या रसायन युक्त पाण्याचा मोठा फटका बसला असून हजारोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडून किनाऱ्यावर तरंगताना दिसत आहेत.
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांबाबत लोकप्रतिनिधी अनेक बैठका घेत असतात या बैठका निव्वळ फार्स ठरत असल्याचे माशांच्या मृत्यू तांडवानंतर दिसत आहे.
मागील काळात घडलेल्या दुर्घटना व स्फोटाचे आवाज व सतत होणारे जल, वायू व ध्वनी प्रदूषण यामुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या परिघातील कुरकुंभ,पांढरेवाडी,मुकदमवस्ती,मळद,पाटस,गिरिम,गोपाळवाडी,दौंड या परिसरातील नागरिक विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. तसेच स्वर्ग व पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. औद्योगिक सुरक्षा विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळ नोटीस बजावण्याच्या पुढे काही कठोर कारवाई करत नाहीत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ व जबाबदार अधिकारी येथे कधी आल्याचे व त्यांनी गांभीर्याने पाहणी केल्याचे आतापर्यंत कधीही आढळून आले नाही असा येथील ग्रामस्थांचा आजवरचा अनुभव आहे.
काही वर्षांपूर्वी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अल्काईल अमाईन्स कंपनीतील स्टॉक यार्डात मोठी आग लागल्याची दुर्घटना झाली होती या अग्नीतांडवाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक जबाबदार पदाधिकाऱ्यांनी आगीच्या घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर कुरकुंभ येथे कुरकुंभ, पांढरेवाडी, मुकादमवाडी, झगडेवाडीसह येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कंपनी निरीक्षक यांच्या ढिसाळ कारभाराचा पाढा वाचला होता यावर त्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईची व प्रदूषण नियंत्रणाचे आश्वासन देऊन कारवाईच्या बढाया मारल्या मात्र पुढे काहीच घडले नाही.
जून २०१५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हेंकेल या अॅडेसिव उत्पादन करणाऱ्या जर्मन कंपनीच्या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी पर्यावरणपूरक शाश्वत विकासाची ग्वाही देऊन स्थानिकांना आश्वस्त केले होते मात्र अद्याप पर्यंत शाश्वत विकास खूप दूरची गोष्ट राहिली असून रासायनिक उद्योगातील उद्योगातील प्रक्रिया केलेलं सांडपाणी कुरकुंभ उद्योग वसाहतीच्या परिसरातच सोडले जात आहे. हे दुषित पाणी सालाबादप्रमाणे पावसाच्या पाण्याबरोबर सगळीकडे पसरून परिसराला अधिकाधिक प्रदूषित बनवत आहे. कुठलीही एखादी दुर्घटना घडली कि बैठकीचा फार्स होतो. यापुढे काहीही घडत नाही.