पुणेरी टाइम्स टीम…
दौंड शहरातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीला संपूर्ण श्रावण महिन्यात विविध रूपांची आरास व पूजा बांधण्यात आल्या होत्या. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील महादेवाच्या पिंडीला ज्याप्रमाणे विविध देवतांच्या रूपात पूजा बांधण्यात येते त्याप्रमाणे दौंड येथील सिद्धेश्वर मंदिराच्या महादेवाच्या पिंडीला विविध रूपांची आरास संपूर्ण श्रावण महिन्यात करण्यात आली.
दर्शन लोहिया या युवकाने यामध्ये प्रामुख्याने पुढाकार घेतला असून शिवभक्त, महाकाल सेना आणि लोहिया परिवारातील महिला सदस्य त्याला या कामांमध्ये मदत करत होत्या. विविध रूपामध्ये सजवलेली पिंड पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी दौंड शहरातून सिद्धेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी झाली होती.
पिंडीवर चंदन लेप, पुष्प पूजा, हळदी कुंकू विड्यांची पाने यांचे आरास, हळदी कुंकू फुले व पणत्यांच्या आरास, श्री भैरवनाथ, श्री खंडोबा, तांदळाच्या शिजवलेल्या भाताची पिंड, पार्वती पूजन, गणपती,श्री दत्त महाराज, अर्ध नटनारीश्वर, श्री हनुमान, सूर्य देव, सप्त धान्य पूजा, अमरनाथाचे बर्फाचे शिवलिंग, कृष्णजन्म, महाकाल अघोरी रुप, तिरुपती बालाजी, निळकंठेश्वर, श्री विठ्ठल रुक्माई या प्रमाणे महादेवाच्या पिंडीवर पूजा मांडण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.
