शिरूरजवळील अपघातात तरुण ठार…
पुणेरी टाइम्स – शिरूर
शिरूर शहराबाहेरून जाणाऱ्या पुणे-नगर रस्त्याजवळील पाषाणमळ्याजवळ काल दिनांक १७ रोजी भरधाव मोटारीची दुचाकीला समोरून धडक बसल्याने झालेल्या अपघातात कुरिअरचे काम करणारा सुधाकर ऊर्फ सोनू रमेश कांबळे (वय २४, रा. इंदिरानगर, शिरूर) हा तरुण ठार झाला.
बुधवारी (ता. १६) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. सुधाकर याचे वडील रमेश श्रावण कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अपघातानंतर तो मोटार जागेवर सोडून पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरिअरचे काम करणाऱ्या कांबळे यांचे कारेगाव (ता. शिरूर) येथे बाभूळसर रस्त्यावर कुरिअरचे कार्यालय आहे. पहाटे सव्वापाचच्या सुमारास तो आपल्या ज्युपिटर दुचाकीवरून (क्र. एमएच १२ टीएल ७२५८) कारेगाव येथे कार्यालयाकडे जात असताना शिरूर बाह्यवळणाच्या अलीकडे पन्नास मीटर अंतरावर पुण्याहून शिरूर शहराच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वोक्सवॅगन मोटार (क्र. एमएच १२ एफयू ०००६) त्याच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतरही बरेच अंतर दुचाकीसह फरफटत नेले. अपघातानंतर मोटारचालक पळून गेल्याने सुमारे अर्धा तासाने या अपघाताची माहिती तेथून फिरायला जाणाऱ्यांना समजली. त्यांनी कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेतील सुधाकर कांबळे याला ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघातप्रकरणी शिरूर पोलिसांनी मोटार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.